प्लॉट खरेदीनंतर प्लॉटचा ताबा घेणे महत्वाचे आहे. तसेच प्लॉटसंबंधी कागदपत्रांवरती आपले नाव लावणे महत्वाचे आहे.
बऱ्याच वेळेस आपण प्लॉट घेतल्यानंतर कित्येक वर्ष त्या प्लॉटकडे फिरकतही नाही. आपल्याला वाटते कि जागा थोडीच चोरी होणार आहे. परंतु अलीकडील काळामध्ये प्लॉट परस्पर विक्रीचे व अतिक्रमणाचे प्रमाण वाढतच आहेत. त्यामुळे बऱ्याच प्लॉट धारकांची फसवणूक होत आहे.
फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी प्लॉट खरेदीनंतर प्लॉटचा रीतसर ताबा घेणे महत्वाचे आहे.
ताबा कसा घ्यावा व आवश्यक कागदपत्रे कशी काढावीत याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.
प्रत्येक्ष प्लॉटचा ताबा कसा घ्यावा.
१. प्लॉट खरेदीकेल्यानंतर ज्याच्याकडून प्लॉट खरेदी केला आहे त्या व्यक्तीकडून प्रत्येक्ष जागेची मोजणी करून, प्लॉटच्या चारही कोपर्यावरती दगडी किंवा सिमिंटचे पोल रोवावेत.
२. यानंतर प्लॉटच्या सर्व बाजूस लोखंडी किंवा सिमेंटचे पोल रोवून तारेचे कंपाऊंड करावे. एखादे छोटस गेट लावावे.
३. प्लॉटमध्ये जागा मालकीचा बोर्ड लावावा. ज्यामध्ये मालकाचे नाव, राहण्याचा पत्ता, मोबाईल नंबर, इ. लिहावे.
४. गरज असल्यास वीज कनेक्शन घेऊन पाण्याचे बोअर मारावे. प्लॉटसंबंधी साहित्य ठेवण्यासाठी एखादी छोटी पत्र्याची खोली बांधावी.
अशा प्रकारे प्लॉटचा ताबा घेतल्यानंतर परस्पर प्लॉट विक्रीचे किंवा जागेवरती अतिक्रमण होण्याचा धोका टाळता येईल.
कागदपत्रे
१. खरेदीखत - प्लॉट खरेदी केल्यानंतर खरेदी खताची मूळ प्रत आपणास मा. सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयामधून मिळते.
२. ७/१२ उतारा - तलाठी कार्यालयामध्ये ७/१२ उताऱ्यावरती आपले नाव लावता येते. व ७/१२ उतारा मिळवता येतो. (टीप - प्रत्येक ३ महिन्याने ७/१२ उतारा काढावा.) आपले नाव आहे का खात्री करावी व संग्रहित करून ठेवावे.
३. मोजणी नकाशा - भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी नकाशा मिळवता येतो.
४. बिनशेती आदेश - जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळवता येतो.
५. मंजूर रेकनकनाची प्रत - नगर रचना कार्यालय, नगरपालिका किंवा महानगरपालिका येथून मिळवता येते.
६. झोन दाखला - नगर रचना कार्यालय, नगरपालिका किंवा महानगरपालिका येथून मिळवता येते.
७. नगरपालिका किंवा महानगरपालिका येथे प्लॉटची रीतसर नोंद करून घर नंबर मिळवता येतो.
८. नगरपालिका किंवा महानगरपालिका येथे प्लॉटची रीतसर नोंद झाल्यानंतर प्रत्येक वर्षी जागेचा कर भरणे आवश्यक आहे.
९. शक्य झाल्यास वरील सर्व कागदपत्रे काढून बांधकाम परवानगी घेऊन ठेवावी.
अशा प्रकारे कागदपत्रे काढून रीतसर प्लॉटचा ताबा घेतल्यास भविष्यात कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा